भविष्यात कामी येयील ,असा भूतकाळ शोधत होतो ,
सज्जावरच्या अडगळीत ,
पुष्कळ आठवणी जमा झाल्या होत्या सज्ज्यावर ,
सायकल दिसली ,गंजली होती थोडी ,
त्याला घट्ट चिटकून असलेली एक आठवण ,
लगेच माझ्या मिठीत शिरली ,अश्या कित्येक आठवणी ..
मनात ,मिठीत शिरत होत्या ,
सिमेंट च्या पोत्यात पुस्तके भरू ठेवलेली ,
कदाचित माझे ज्ञान ही त्याच पोत्यात बांधून ठेवले होते मी आजवर ....
रडत दिसले ......
एक डायरी दिसली ,
ज्यात तुझा अन माझा,
इतिहास कैद करून ठेवला होता ,
पहिल्याच पानावर ,
तुझे अन माझे नाव ...
शुभ -लाभ लिहितात तसेच ,
तू माझ्यासाठी शुभ होतीस ,आहेस ,
मी तुझ्यासाठी लाभ होतो ...हे उशिरा कळले ...
तुला ही वाटत असेलच ना ,
मी तुझा फायदा उचलला असे, जसे मला वाटत आले आहे ....
पान पलटवले ,
दुसऱ्या पानावर, तुला पहिल्यांदा ज्या दिवशी पाहिले होते ,
तो दिवस प्रेमात पडलेला दिसला...
आनंदी होता **...
पान पलटवले ,
तिसऱ्या,चौथ्या ,पाचव्या ,१०० व्या पानावर ,
तुला पहायला तरसत असलेले दिवस ,
तू दिसावी म्हणून तुझ्या घराकडे सायकलवर बसून ,
पूर्ण यवतमाळ पिंजून काढणारे दिवस ...
मी तुझ्या मागे नाही कामानिम्मित तिकडे आलो आहे ,
असे हुशारीपणा करणारे,
उत्सुक दिवस दिसले **
पान पलटवले,
पुढल्या काही पानांवर ....
थोडी हिम्मत वाढवून ,
तुझ्याशी मनातले बोलू असे विचार करणारे ,
घाबरट दिवस दिसले ...**
पान पलटवले,
पुढल्या पानांवर
'मला माहिती आहे तू मला जास्त ओळखत नाहीस,
मला माहित आहे,कदाचित तुला वाटेल मी लोफर आहे,
नुसता तुझ्या मागे फिरतो ,पण
'तू जेंव्हा लाजून थोडी घाबरून माझ्या समोरून गेलीस' ....
ही कविता म्हटल्यावर, मी तुझ्यावर प्रेम करतो "
असे सांगणारा एक याचक दिवस दिसला ...
आणि त्या दिवसाला तुझ्या दिवसाने दिलेला होकारही दिसला ...
ते पान खूप सुगंधी होते ..
तो दिवस ही सुगंधी दिसला...
पुढल्या पुष्कळ पानांवर ,
पुष्कळ प्रेमळ दिवस दिसले ,कधी हसणारे
कधी रुसणारे ,कधी भांडणारे ,कधी ......
त्यानंतर पान उलटले ,
आपण शेवटले भेटलो होतो तो दिवस दिसला ,
आत्महत्येचा विचार कारणारा दिवस,
हताश ,संतापलेला ,रडणारा ,तुटलेला ,***
त्या नंतरची सारी पाने कोरी होती ,
जखमा तश्याही दिसू देऊ नये म्हणतात ....
सिमेंटच्या पोत्यात ,
आपल्या प्रेमाच्या जखमांचे रक्त
गोठले गेले होते ,(कदाचित )
असो ,
एक खरे आहे ,
आता कशाचाच त्रास मात्र होत नाही ,
आणि आनंद मुद्दामच शेवटल्या जखमासोबत ,
सिमेंटच्या पोत्यात बांधून ठेवतो ...
बस बाकी काही नाही ..
नि:शब्द(देव)
No comments:
Post a Comment